सटाणा/एनजीएन नेटवर्क
राज्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अस्मानी व सुलतानी संकट, दुष्काळी परिस्थिती, पिकांना नसलेला भाव, रासायनिक खतांचे वाढलेले दर या बिकट परिस्थितीमुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला असून शेतकर्यांना पीककर्ज आणि विजबिल भरणे शक्य नाही. त्यामुळे राज्य शासनाने बागलाण तालुका तात्काळ दुष्काळी जाहीर करावा तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांची विज बिले सरसकट माफ करून बळीराजाला दिलासा द्यावा, या मागणीसाठी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
यासंदर्भात माजी आमदार चव्हाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून बळीराजा हा आपल्या राज्याचा प्रमुख आर्थिक कणा आहे. कोरोना संकट काळात सर्व व्यवहार ठप्प असतानाही बळीराजा आपल्या जीवाची परवा न करता शेतात जनतेसाठी कष्ट घेवून अन्नधान्य पिकवत होता. मात्र सर्वांची काळजी घेणार्या बळीराजावरील संकटे काही कमी होत नाहीत. यंदा जुन महिन्यापासून नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यंत तुरळक पाऊस झाला असून सध्या सर्वत्र भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पाऊसच नसल्याने दुबार पेरणी केलेली पिके सुद्धा जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. विहीरींमध्येही अत्यंत कमी प्रमाणात पाणी शिल्लक आहे.
या वर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे महिन्यात सातत्याने गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातल्याने बागलाण तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असतानाही अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. कांद्याला जाहिर केलेले ३५० रुपयांचे अनुदानही शासनाने अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करुनही अद्याप त्यांच्या हाती काहीही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
पिकांना भाव नसल्याने घेतलेले पीककर्ज फेडणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. अस्मानी व सुलतानी संकट, दुष्काळी परिस्थिती, पिकांना नसलेला भाव, रासायनिक खतांचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांसह शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर विजबिल कसे भरावे असा प्रश्न पडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. पाऊस कमी असल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता बागलाण तालुका त्वरित दुष्काळी जाहिर करावा तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांची विज बिले माफ करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही माजी आमदार चव्हाण यांनी यावेळी केली.