घोटी/राहुल सुराणा
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर उभा महाराष्ट्र धास्तावला असताना आज इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ला आणि पर्यटक असे वेगळे नाते निर्माण झाले आहे. आज शुक्रवारी किल्ल्याचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तथापि, पावसाचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. किल्ल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणाऱ्या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सुचित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सप्तश्रृंगी गडवासियांचा मुख्यमंत्र्यांकडे पत्रप्रपंच
सप्तश्रृंगी गड/विशेष प्रतिनिधी
दरम्यान. सप्तश्रृंगी गडावरील पहिल्या पायरीनजीकच्या धोकादायक भागाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामपंचायच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात सप्तश्रृंग गडावर माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना होण्याची भीती स्थानिक ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे. केली आहे.
पत्राचा आशय असा : समुद्र सपाटीपासून १४८० मीटर उंचीवर असलेले सप्तश्रृंगी गड देवस्थान साडेतीन पीठांपैकी एक असून येथे नियमित १५ ते २० हजार तर वर्षभरात ५० ते ६० लाख भाविक भेट देत असतात. गडावर चार ते पाच हजार स्थानिक लोकसंख्या आहे. सप्तश्रृंगी मातेचे मंदिर हे डोंगरकपारीत असून मंदिर परिसरातील पायऱ्यांवरील रामटप्पा, कासवटप्पा आणि फनिक्युलर ट्राॅली मार्गाच्या परिसरातील काही भाग ठिसूळ झाला आहे. या भागाच्या खाली दुकाने आणि नागरी वस्ती आहे. हा ठिसूळ भाग कोसळला तर नागरी वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी सरकारकडून आधुनिक पद्धतीने संरक्षित जाळी गडावर (गर्डर) बसविण्यात आली आहे. मात्र ती कुचकामी आहे. त्यामुळे इर्शाळवाडीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सप्तशृंग गड चर्चेत आला आहे. गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.