चाळीसगाव/एनजीएन नेटवर्क
शेतातील पडीक घरात गुप्तधनासाठी अघोरी पूजा करणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, चाळीसगाव नजिक नागद रस्त्यालगत शेतातील पडीक घरात आषाढ अमावास्या असल्याने गुप्तधनासाठी अघोरी पूजा होणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून मांत्रिकासह नऊ संशयितांना ताब्यात घेतले. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अरुण जाधव (४२,आसरबारी, पेठ, नाशिक), विजय बागूल (३२, जेल रोड, नाशिक), राहुल याज्ञिक (२६, ननाशी, दिंडोरी, नाशिक), अंकुश गवळी (२१, जोरपाडा, दिंडोरी, नाशिक), संतोष वाघचौरे (४२, अशोकनगर, नाशिक) या पाच जणांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून भ्रमणध्वनी संच, मोटार, मानवी कवटी, लिंबू, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मूर्ती, पिवळ्या धातूचा नाग, पत्र्यावरील छापील देव, कंदमुळे, गोलाकार पितळी धातूचे बेरकंगण, केशरी शेंदूर, अगरबत्ती पुडा, अडकित्ता, कापराची डबी आदी पूजासाहित्य असा सुमारे आठ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.