NGN News
Latest Marathi News

आखाडा महापालिकेचा ! नाशिक, मालेगावमध्ये राजकीय हालचाली गतिमान

  • महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशीच लढत अपेक्षित

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका सोमवारी जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक आणि मालेगाव महापालिकांचा समावेश आहे. निवडणुकीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नाशिक महापालिकेसाठी महायुती विरुध्द महाविकास आघाडी तर मालेगावमध्ये एमआयएम विरोधात महाविकास आघाडी आणि महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे.

राज्यातील राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण महापालिका म्हणून नाशिकचा उल्लेख करण्यात येतो. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ६६ जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. तेव्हाच्या एकसंध शिवसेनेला ३५ जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतरांना तेव्हा फार प्रभाव दाखवता आला नव्हता. भाजपच्या दृष्टीने सत्ता राखण्याचे आव्हान आहे. ही निवडणूक पक्षाला महायुतीत लढवायची असल्याने शहरात चांगल्यापैकी प्रभाव असलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसला किती जागा सोडणार यावर महायुतीच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. शिवाय, पक्षात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर झालेले इनकमिंग पाहता भाजपला स्वकीयांच्या इच्छेला मुरड घालण्याची कसरत करावी लागणार हे निश्चित.

मुलाखतीद्वारे भाजपची आघाडी..

दरम्यान, भाजपने शहरातील सर्व ३१ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि आमदार यांच्या समक्ष पक्षासाठी केलेले काम, पक्षनिष्ठा, जनसंपर्क, प्रस्तावित विकासकामे आदी मुद्द्यांवर आधारित मुलाखतींना सामोरे जावे लागत असल्याने अनेकांची अडचण होत आहे. नव्या-जुन्यांची सांगड घालण्यात नेतृत्व कोणती धोरणे प्रमाण मानते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

शिंदेंच्या शिवसेनेला हवा ५० टक्के हिस्सा..

निवडणूक जाहीर होताक्षणी शिवसेनेने तातडीची बैठक घेत थेट ५० टक्के जागांची मागणी केली आहे. या प्रमाणात जागा मिळाल्या तरच युती करण्यात येईल, असा जाहीर इशारा पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने दिला आहे. या पक्षात देखील इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय, उद्या भाजपमध्ये डावलले गेलेले दुसरी पसंती म्हणून शिवसेनेचा मार्ग चोखाळू शकतात. शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची फार ताकद नसल्याने महायुती घटकपक्ष म्हणून शिवसेनेची ‘बार्गेनिंग पॉवर’ वधु शकते.

महाविकास आघाडीत शुकशुकाट..

नाशिक शहरात महाविकास आघाडीचा विचार केल्यास शिवसेना ( उबाठा ) पक्ष काही प्रमाणात अस्तित्व दाखवू शकतो. तथापि. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ) या पक्षाच्या संघटनावरच प्रश्नचिन्ह आहे. या आघाडीत शिवसेना ( उबाठा ) पक्ष मोठा भाऊ असण्याची अधिक शक्यता आहे.

मालेगावी ‘एमआयएम’ची प्रतिष्ठा पणाला..

मालेगाव महापालिकेचा विचार करता तेथील तब्बल ८० टक्के भाग मुस्लीमबहुल आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात एमआयएमचे आमदार आहेत. स्वाभाविकच उमेदवारीसाठी या पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी असेल. समाजवादी पक्ष, महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ) हे पक्ष आणि स्थानिक आघाड्या निवडणूक मैदानात उतरू शकतात. हिंदुबहुल भागात शिवसेनेचे प्राबल्य आहेच, शिवाय मंत्री दादाजी भुसे यांचा मतदारसंघ त्यामध्ये येत असल्याने भाजपला सोबत घेत भुसे अधिकाधिक किती जागा महायुतीला मिळवून देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.