नाशिक/एनजीएन नेटवर्क
झोपडपट्टी परिसरात धुडगूस घालणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळ्यांतील २० जणांना एकाचवेळी तडीपार करण्याचा निर्णय घेवून नाशिक पोलिसांनी धडाकेबाज निर्णयाची प्रचीती दिली आहे. संबंधित प्रकरणातील चार अल्पवयीन बालके आणि कारागृहातील दोन संशयित वगळता उर्वरित २० जणांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील बजरंगवाडी परिसरात तीन महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दोन गुन्हेगारी टोळ्यांचे आपसात वाद झाले होते. यावेळी काचेच्या बाटल्या, कोयत्याने परस्परांवर हल्ला करण्यात आला होता. दगडफेकही झाली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या प्रकरणी दहशत माजविणाऱ्या २६ जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. यात २२ संशयित आणि चार अल्पवयीन बालकांचा समावेश होता. संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांची परिसरात दहशत आहे. उपरोक्त घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन शांतता राखण्याच्या उद्देशाने मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की आणि सहायक आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ यांच्या शिफारशीनुसार पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी चार अल्पवयीन बालके आणि कारागृहात असणारे दोन संशयित वगळता उर्वरित २० जणांना नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.