पुणे/एनजीएन नेटवर्क
पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यात समोर आली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
अमरावती पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.