नाशिक/एनजीएन नेटवर्क
जिल्ह्यात नुकत्याच अंधश्रद्धेतुन झालेल्या काही घटनांमुळे पोलीस प्रशासन व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एकत्रित प्रबोधन मोहिम राबविणार आहे.
महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धेविरोधात जादुटोणा विरोधी कायदा संमत केला. परंतु राज्यात अंधश्रद्धेतुन होणाऱ्या घटना कमी होत नाही. नाशिक जिल्हा याला अपवाद नाही. नुकताच मालेगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलाचा नरबळी गेला. नाशिकच्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेतुन अनेक गुन्हे दाखल झाले आहे. पोलीस प्रशासन अशा घटनांत योग्य ती कारवाई करतात. मात्र त्यापलीकडे जाऊन समाजात अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन करुन असे प्रकार कमी करण्याचे नाशिक जिल्हा ( ग्रामीण) चे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची ठरविले आहे. त्यांनी अंनीसचे पदाधिकारी महेंद्र दातरंगे यांच्याशी त्या बाबत चर्चा केली. पोलीस आधिकारी व अंनिस कार्यकर्ते प्रबोधन मोहिम राबविणार आहे. नाशिक जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात प्रबोधन कार्यक्रम करण्याचे त्या बैठकीत ठरले असुन लवकरच या प्रबोधन मोहिमेचा शुभारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयातून होईल. ग्रामीण भागात विशेषतः बाजारच अथवा गर्दीच्या ठिकाणी असे कार्यक्रम सादर करण्यात येणार असून त्यामध्ये भोंदुबाबा करत असलेले चमत्कार, पथनाट्य, व्याख्यान यांचा समावेश असणार आहे. जादूटोणा विरोधी कायद्याचे पोस्टर्स प्रदर्शन लावुन या कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यामुळे अंधश्रद्धेविरोधात अधिक जागरुकता होईल अशी आशा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केली.
या बैठकीत पोलीस निरीक्षक ( स्थानिक गुन्हे शाखा) हेमंत पाटील व इतर आधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डाॅ. टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रा डाॅ सुदेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, प्रल्हाद मिस्त्री, डाॅ शामसुंदर झळके, नितीन बागुल, महेंद्र दातरंगे, ॲड समीर शिंदे, कोमल वर्दे,विजय खंडेराव ,प्रथमेश वर्दे,यशदा चांदगुडे आदी या मोहिमेत सामील होणार आहे.