NGN News
Latest Marathi News

कवी राजू देसले यांना डॉ. म. सु. पाटील पुरस्कार जाहीर

रू. 5000 रू. मानपत्र व स्मृति चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिकतर्फे दिल्या जाणार्‍या पहिल्या डॉ. म. सु. पाटील पुरस्कारासाठी राजू देसले यांनी संपादित केलेल्या ‘अंधातर: भूमी व अवकाश’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे.

समीक्षक, संपादनासाठी हा विशेष पुरस्कार प्रतिष्ठानतर्फे या वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. नाशिक येथे दि. शनिवार 17 व रविवार 18 2026 जानेवारी रोजी नाशिक येथे संपन्न होणार्‍या ‘अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात’ हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. रू. 5000 रू. मानपत्र व स्मृति चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी सांगितले.

डॉ. म. सु. पाटील यांनी समीक्षा लेखन करून मराठी समीक्षेला दिशा दिली आहे. समीक्षेचा वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला. समीक्षा ही सर्जनशील प्रक्रिया असते असे त्यांचे मत होते. आपल्या लेखनातून त्यांनी समीक्षेला नवा आयाम दिला.

संत परंपरा, भारतीय साहित्यशास्त्र आणि पाश्‍चात्य साहित्यशास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. त्यातून चौदाहून अधिक महत्वाच्या ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली आणि मराठी साहित्य समृद्ध केले. आदि समीक्षेचा नवा विचार त्यांनी दिला. मनमाड येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले असून अनेक विद्यार्थ्यांना घडविले. अनुष्टूभ या द्वैमासिकचेही ते संपादक होते. वाचन संस्कृतीच्या विकासातही त्यांचे योगदान होते.

‘अंधातर: भूमी व अवकाश’ लोकवाङमय गृहाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात नाटककार जयंत पवार यांच्या ‘अंधातर’ या नाटकाचा संहिता ते प्रयोग चा अंगाने अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. त्यात नाटकातील कलावंत ते साहित्य, नाट्यशास्त्राचे अभ्यासक यांच्या लेखांमुळे एक इतिहास घडवणार्‍या नाटकाचे दस्तऐवजीकरण झाले आहे. निवड समितीत डॉ. एकनाथ पगार, कवी प्रकाश होळकर, देविदास चौधरी यांचा समावेश होता.

Comments are closed.