नाशिक/एनजीएन नेटवर्क
पंजाब नॅशनल बँक ग्राहकोन्मुख सेवा देण्यात अग्रेसर आहे. विविध डिजिटल उत्पादने देत 24X7 ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबध्द आहे, असे प्रतिपादन बँकेचे महाव्यवस्थापक राजेश भौमिक यांनी केले.
पंजाब नॅशनल बँक, नाशिक मंडलतर्फे हॉटेल एसएसके सोलिटीअर येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी जलज शर्मा, ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘आयमा’चे अध्यक्ष निखील पांचाळ आदी उपस्थित होते. आपल्या मनोगतात जिल्हाधिकारी शर्मा यांनी बँकिंग सेवेतील वाढत्या स्पर्धेचा उल्लेख करीत ग्राहकाभिमुख सेवा आणि तत्परता या बाबी बँकांसाठी परवलीच्या व्याख्या बनल्या आहेत. बेळे आपल्या भाषणात म्हणाले, आज डीजीटलच्या जमान्यात बँकांनी आवश्यक ते बदल करून सुविधा पुरवणे गरजेचे आहे. पांचाळ यांनीदेखील बँकिंग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा उल्लेख भाषणात केला.
पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असून स्वदेशी बँक म्हणून तिला 129 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. नाशिक मधील एमएसएमई उद्योगांना मदत करण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे, असे नाशिक मंडल प्रमुख नवीन बुंदेला यांनी सांगितले.
याप्रसंगी विविध एमएसएमई उद्योगांना 75 कोटी रुपयांची स्वीकृतीपत्रे देण्यात आली. तर सुमारे 510 कोटी रुपयांचे प्रस्ताव अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यावर योग्य कारवाई लवकरच केली जाईल हे आश्वासन देण्यात आले. बँकेच्या विविध उपयोगी योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थितांचे आभार उपमंडल प्रमुख राकेश पवार यांनी व्यक्त केले.