इम्फाळ/एनजीएन नेटवर्क
मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली. त्यानंतर दोन महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेवर भाष्य केले आहे. तसेच मणिपूरच्या मुलींबरोबर झालेला प्रकार कधीही माफ केला जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले.
मोदी म्हणाले, माझे मन दुःख आणि रागाने भरले आहे. मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावले आहे. १४० कोटी देशवासीयांना खाली पहावे लागत आहे. सर्व मुख्यमंत्र्यांना आग्रह आहे की, सर्वांनी आपापल्या राज्यात कायदा सुव्यवस्था मजबूत करावी. आपल्या आई-बहिणींच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर पावले उचलावीत. घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो, या देशात कोणत्याही भागात, कोणत्याही राज्यात राजकीय वादापलिकडे जाऊन कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले आहे.