नाशिक/एनजीएन नेटवर्क
पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होत असून येवल्यात 8 जुलै रोजी पहिली सभा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
येवल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे माणिकराव शिंदे यांनी पुन्हा पक्षात प्रवेश करत शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. सध्या ते सिल्वर ओक निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले आहेत. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी विरोधात काम केल्यामुळे राष्ट्रवादीतून 2019 साली हकालपट्टी झाली होती. मात्र छगन भुजबळ हेच पवारांच्या विरोधात गेल्याने आज शरद पवारांची भेट घेऊन शिंदे यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. येवला येथे 8 जुलै रोजी शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सभा आयोजित करण्यात येणार आहे. पवार यांचे कधीकाळचे विश्वासू छगन भुजबळ यांनी अजितदादा यांची साथ दिल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.