मुंबई/एनजीएन नेटवर्क
पक्ष फुटी नंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. या दोन्ही नेत्यांना अलिकडेच पक्षात केंद्रीय नेतृत्वात मोठी पदं देण्यात आली होती. परंतु या दोन्ही नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर आता कारवाई केली आहे. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे की, मी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे.सुनील तटकरे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव होते तसेच त्यांना ओदिशा, पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील समितींच्या बैठका, संसद अधिवेशन, निवडणूक आयोग, अल्पसंख्याक विषयक मुद्दे त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.