NGN News
Latest Marathi News

पर्युषण पर्व- क्षमा आणि प्रेमात हिंसेला स्थान नाही ( प्रासंगिक/अॅड. कांतिलाल तातेड )

एनजीएन न्यूज नेटवर्क

बुधवार दिनांक २७ ऑगस्ट, २०२५ रोजी जैनांचा ‘संवत्सरी पर्व’ आहे. त्यानिमित्ताने..

जैन धर्मात पर्युषण पर्वाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. पर्युषण म्हणजे अंध:कारापासून प्रकाशाकडे करावयाची वाटचाल. तर पर्व म्हणजे पवित्र दिवस. पर्युषण म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपू रुपी अंधकाराचा क्षमा, शांती व आत्मशुद्धिद्वारे नायनाट करून त्याद्वारे आंतरिक शांती प्राप्त करून उज्ज्वल, दिव्य व प्रकाशमय अशा मार्गाने आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करणे होय.

शरीर जड, क्षणभंगुर व नश्वर असून आत्मा हा सचेत, अजर, अमर व अविनाशी आहे. त्यामुळे सुखासिनतेचा, शरीराच्या मोहाचा व भोगाचा त्याग करून आत्म्याला जाणा व आत्म्याच्या उन्नतीच्या दिशेने प्रस्थान करा, असा संदेश देणारे हे महान पर्व आहे. शरीराच्या नश्वरतेची जाणीव करून देऊन जीवन सार्थकी लागण्यासाठी आपल्या आंतरिक सामर्थ्याद्वारे आत्म्याची ओळख करून देऊन आध्यात्मिक प्रगतीद्वारे काळोखाकडून प्रकाशाकडे, उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे पर्व म्हणजे पर्युषण पर्व. क्रोधाला प्रेमाने, अशांतीला शांतीने तर वैराला मैत्रीने जिंकून विश्वशांती प्रस्थापित करणे शक्य आहे, असे प्रतिपादन करणारे पर्व म्हणजे पर्युषण पर्व आहे. आंतरिक जागृतीद्वारे आत्म्यावरील किल्मिष, मलीनता दूर करून पवित्र आत्म्याच्या सहाय्याने जीवनातील सर्वोच्च आनंदाचा अनुभव घेणे, हे या पर्युषण पर्वाचे वैशिष्ट आहे. थोडक्यात मनुष्याला सुखाचा मूलमंत्र सांगून त्याला त्याची अनुभूती देणाऱ्या या महापर्वाचे म्हणूनच आपल्या जीवनात फार महत्व आहे.

क्षमेचे सामर्थ्य

क्षमा मागणे व क्षमा करणे म्हणजे मनाचा कमकुवतपणा नाही तर ती मनाची, अंत:करणाची दिव्य शक्ती आहे.संपूर्ण विश्वाला कवेत घेण्याचे त्यामध्ये सामर्थ्य आहे. त्यामुळेच पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ‘संवत्सरी महापर्वा’च्या दिवशी केवळ व्यक्तीचीच नव्हे तर विश्वातील अतिसूक्ष्म जीवांची देखील पवित्र मनाने अंत:करणापासून क्षमा मागितली जाते. तसेच ज्यांनी आपल्याला त्रास, वेदना व दु:ख दिलेले आहे त्यांना उदार अंत:करणाने क्षमा केली जाते. क्षमा हा आत्म्याचा स्वभाव आहे. त्यामुळे क्षमेमध्ये समत्व आहे. क्षमा ही अहिंसा व प्रेमाची जननी आहे.क्षमा म्हणजे अहंकार व क्रोधाचे विसर्जन आहे. क्षमा म्हणजे विनयशीलतेचा सर्वोच्च अविष्कार आहे. सुखाने व शांततेने जीवन जगण्याचा हा महामंत्र आहे. आणि म्हणूनच संवत्सरी पर्वाला ‘महापर्व’ म्हणून संबोधले जाते.

अहिंसा- धर्माचा मुलभूत पाया

‘अहिंसा परमो धर्म:’ हा जैन धर्माचा गाभा आहे. तो जैन धर्माचा मुलभूत पाया आहे. क्षमा, शांती व प्रेमात हिंसेला स्थान नाही. कारण जेथे हिंसा आहे तेथे प्रेम असूच शकत नाही. आज धर्माधर्मात तेढ आहे, द्वेष आहे, धार्मिक उन्माद आहे, संघर्ष आहे.धर्माचे संरक्षण करण्याच्या नावाखाली हिंसेचा सर्रास वापर केला जात आहे. परंतु हिंसा हे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही .हिंसा
कोणत्याही धर्माला मान्य नाही. हिंसेमुळे धर्म मजबूत नाही तर दुर्बल होतो. लोकांची धर्मावरील श्रद्धा कमी होण्याचा धोका असतो. हिंसा हा विकासाचा नव्हे तर विनाशाचा मार्ग आहे.’खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे’ या मानवता धर्मावर आधारित आपली संस्कृती आहे.जैन धर्माचा हा मुलभूत पाया आहे,हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

धनसंचय हे दु:खाचे कारण आहे.तर ‘अपरिग्रह’ ही सुखाकडे करावयाची वाटचाल आहे.तसेच कोणतीही वस्तू अनेकात्म असते. त्यामुळे सर्व दृष्टिकोनांचा , वास्तवतेचा एकत्रित विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करणारा ‘अनेकांतवादा’चा सिद्धांत हे परिपूर्ण व समृद्ध असे जीवन जगण्यासाठी आवश्यक असे सिद्धांत आहेत. ती आमची जीवनप्रणाली होणे आवश्यक आहे.
त्यामुळे शरीराच्या मोहातून बाहेर पडून आत्म्याच्या उन्नतीच्या दिशेने प्रस्थान करण्यासंबंधीचा महान संदेश देणाऱ्या पर्युषण पर्वाचे महत्व प्रत्येकाच्या जीवनात फार मोठे आहे.

लेखक:–Adv.कांतिलाल मोतीलाल तातेड
जीवन स्वप्न को -ऑप हौसिंग सोसा . बंगला न. ५
महिला बँकेच्या मागे इंदिरानगर, नासिक .
,४२२००९

मोबाईल :९९२३०२९४२४

e-mail:- kantilaltated@gmail.com

Comments are closed.