** एनजीएन नेटवर्क
पर्युषण म्हणजे अंध:कारापासून प्रकाशाकडे करावयाची वाटचाल. तर पर्व म्हणजे पवित्र दिवस. म्हणून पर्युषण म्हणजे काम, क्रोध, मोह आदि षडरिपू रुपी अंधकाराचा क्षमा, शांती व आत्मशुद्धिद्वारे नायनाट करून उज्ज्वल, दिव्य व प्रकाशमय अशा मार्गाने आपल्या जीवनाची वाटचाल करणे होय. जीवनातील खऱ्या आनंदाची ओळख करून देऊन शरीराकडून आत्म्याकडे व आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रस्थान करण्यास उद्युक्त करणारा जैनांचा सर्वात महत्वाचा असा आध्यात्मिक सण- उत्सव म्हणजे पर्युषण पर्व होय.
संवत्सरी पर्व म्हणजे आत्मशुद्धीसाठीचे महापर्व व आत्मोन्नतीचा धार्मिक महोत्सव आहे. समस्त ज्ञानाचा स्रोत म्हणजे आत्मा. त्या आत्म्याला जाणून घेणे म्हणजेच आपण आपली स्वत:ची ओळख करून घेणे होय.जो स्वत:ला जाणतो तो सर्वांना जाणून घेऊ शकतो. त्यांची सुख- दु:ख समजून घेऊ शकतो.
आत्मशुद्दीची आवश्यकता
आपले शरीर जड, अचेतन, क्षणभंगुर व नश्वर आहे.परंतु आपल्याला सुख –दु:खाची जाणीव,अनुभूती करून देणारा आत्मा हा सचेत, अजर, अमर व शाश्वत आहे. तो ज्ञानमय आहे. शरीरात आत्मा असला तरी त्याचे अस्तित्व स्वतंत्र असते.जोपर्यंत आपण आत्म्याला जाणून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण परमात्म्याला समजू शकत नाही. त्यामुळे परमात्म्याला जाणून घ्यावयाचे असेल तर आत्मशुद्धीची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या मोहाचा त्याग करण्याची आवश्यकता आहे. म्हणून पर्युषणाच्या सुरुवातीच्या दिवसात त्याग, तप, उपासना, धार्मिक वाचन व श्रवण याद्वारे आत्मशुद्धी करावयाची व शेवटच्या म्हणजे संवत्सरीच्या दिवशी शुद्ध व निर्मल मनाने- आत्म्याने सर्वांची आपल्याकडून कळत न कळत झालेल्या चुकांची क्षमा मागवायची. तसेच आपणही सर्वांना क्षमा करावयाची.
क्षमेचे महात्म्य
आपण केलेल्या चुकांमुळे दुसऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल प्रश्चातापाच्या भावनेने अंत:करण पूर्वक क्षमा मागणे तसेच दुसऱ्याने आपल्याला दिलेल्या त्रासाबद्दल आपण त्याला उदार अंत:करणाने क्षमा करणे हे मनुष्य जीवनाचे सार आहे. जैन धर्माचा तो मूलाधार आहे. समत्वाचे त्याला अधिष्ठान आहे. अहिंसेचे ते उगमस्थान आहे. क्षमा म्हणजे अहिंसेची जननी आहे. मानवतेला जो कवेत घेतो इतरांच्या वेदना जो जाणतो तोच खरा धर्म. तोच खरा मानवता धर्म.लोकांनी माझ्याशी कसे वागावे अशी माझी इतरांकडून जी अपेक्षा असते, तसेच मी त्यांच्याशी वागावे हाच खरा धर्म. सुखाचा हा खरा मूलमंत्र आहे. हीच खरी जीवनाची उपजत प्रेरणा असते. या प्रेरणेला जागृत करणे हे संवत्सरी पर्वात अपेक्षित असते.
अहिंसा शाश्वत सिद्धांत
जैन धर्माने अहिंसेचा अतिसूक्ष्म असा विचार केलेला आहे. विश्वामध्ये अतिसूक्ष्म जीवांना देखील मानवाप्रमाणेच जीवन जगण्याचा अधिकार आहे.त्यामुळे कळत न कळत त्यांची हत्या झालेली असेल, त्यांना आपल्यामुळे काही त्रास, वेदना झालेली असेल तर संवत्सरी महापर्वाच्या दिवशी त्यांची देखील क्षमा मागितली जाते. ‘जगा व जगू द्या’, हा जैन धर्माचा महत्वाचा सिद्धांत असून यात हिंसेला स्थान नाही. त्यामुळे जैन धर्मातील जीवनमूल्ये अंगी बाणवून क्षमा, शांती व प्रेमाच्या सहाय्याने जीवनातील सर्वोच्च आनंद प्राप्त करण्यासंबंधीचा मार्ग दाखविणाऱ्या पर्युषण पर्वाचे म्हणूनच खूप महत्व आहे.
लेखक :– अॅड. कांतिलाल मोतीलाल तातेड
जीवन स्वप्न को -ऑप हौसिंग सोसा . बंगला न. ५ महिला बँकेच्या मागे इंदिरानगर, नासिक . ,४२२००९
मोबाईल :९९२३०२९४२४ e-mail:- kantilaltated@gmail.com