मुंबई/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘घड्याळ’ पक्षचिन्हाबाबत मोठे विधान केले आहे. पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी वाय बी सेंटर सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
पवार म्हणाले, मंगळवारी नाशिकला पक्षाच्या कार्यालयात काहीतरी गडबड केली गेली. काही लोकांनी कार्यालयाचा ताबा घेतला. ते कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे. तुम्ही (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगता आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. पण उद्या कुणीही उठेल आणि मीच काँग्रेस आहे, मीच शिवसेना आहे, मीच भाजपा आहे, असे सांगायला लागले, तर याला काही अर्थ आहे का? त्यामुळे अशाप्रकारे भूमिका मांडून कार्यालयाचा ताबा घेणे, ही बाब लोकशाहीमध्ये योग्य नाही. जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा टिळक भवन आमच्याकडे होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही नवीन पक्ष काढायचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही टिळक भवन सोडून दिलं. कारण ती मालमत्ता कॉंग्रेस पक्षाची होती. ती मालमत्ता हिसकावून घ्यायची आम्हाला आवश्यकताही नव्हती. कारण ती मालमत्ता आमच्याच हातात होती, असे उदाहरण यावेळी शरद पवारांनी दिले.
पक्षचिन्ह देशाचे राजकारण ठरवत नाही
पवार पुढे म्हणाले, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचा आहे, असे काही लोक सांगत आहेत. ती घड्याळाची खूण आमची आहे, असेही ते म्हणतायत. ठीक आहे, तुम्ही तसे म्हणू शकता. पण निवडणूक आयोगानं घड्याळाची खूण कुणाला दिली, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तुमच्यासाठी सांगतो, ती खूण (घड्याळ) कुठेही जाणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की एखादी खूण (पक्षचिन्ह) देशाचे राजकारण ठरवत नाही.