कोलकाता/एनजीएन नेटवर्क
रील बनवण्यासाठी महागडा आयफोन खरेदी करता यावा म्हणून या जोडप्याने आपले 8 महिन्यांचे बाळ विकल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात उघड झाली आहे.
मुलाच्या आई आणि वडील यांना अटक करण्यात आली आहे. या दाम्पत्याच्या शेजाऱ्यांना बाळ न दिसल्याने त्यांनी बाळ कुठे आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दाम्पत्याच्या वागण्यात अचानक झालेला बदल पाहून त्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला असता, या दाम्पत्याने पैशाच्या बदल्यात मुलगा विकल्याचे कबूल केले. काही दिवसांपूर्वी या जोडप्याचा दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष सुरू होता आणि अचानक त्यांनी आयफोन विकत घेतला. इतकेच नाही तर रील बनवण्यासाठी राज्याच्या विविध भागांचा दौरा केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच खारदह परिसरातील एका महिलेकडून बाळाची सुटका करण्यात आली. या जोडप्याने आपला मुलगा मोबाईल फोन घेण्यासाठी या महिलेला विकला होता. प्रियंका घोष नावाच्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे.