निफाड/एनजीएन नेटवर्क
प्रेमविवाह करायचा असेल तर त्यासाठी आई-वडिलांचे परवानगी पत्र घ्यावे लागेल, असा ठराव सायखेडा ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी या संदर्भातील पत्र पंचायतीला दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या नव्या निर्णयाची जिल्हाभर चर्चा होत आहे. अशा प्रकारचा ठराव करणारी सायखेडा राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सायखेडा हद्दीत येणाऱ्या प्रत्येक युवक-युवतींना यापुढे प्रेमविवाह करायचा असल्यास आई- वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच त्यांना विवाह करता येईल, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. प्रेमविवाहानंतर आई-वडिलांच्या परवानगीचे पत्र असेल तरच ग्रामपंचायती दप्तरी विवाहाची नोंद करण्यात येणार आहे. त्यानंतर विवाह केल्याचा दाखला मिळणार आहे. ग्रामपचांयतीने अलीकडेच ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा करावा अशी मागणीही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केली आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.