नाशिक/एनजीएन नेटवर्क
येथील गजरा उद्योगसमूहाचे संचालक तथा बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांची अपहरणानंतर सुखरूप घरवापसी झाली आहे. तथापि पंधरा तासांच्या या थरार नाट्याबाबत उपस्थित झालेले अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. पारख यांचे अपहरण करून त्यांना शेकडो किलोमीटर अंतरावर सोडून देण्यामागे अपहरण कर्त्यांचा नेमका उद्देश काय होता, असा मूळ प्रश्न आहे. यासंदर्भात स्वतः पारख अथवा पोलीस भाष्य करतील, तेव्हाच काही प्रश्नांची उकल होवू शकते.
पारख यांचे गेल्या शनिवारी (दि. २) रात्री साडेनऊच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील बंगल्यासमोरून अपहरण करण्यात आले होते. कारमधून आलेल्या संशयितांनी त्यांचे अपहरण केले. अवघ्या काही क्षणांत त्यांना घेवून जाणारी मोटारगाडी अदृश्य झाल्याने कुटुंबियांची अस्वस्थता वाढली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याने अवघी यंत्रणा कामाला लागली. मात्र रविवारी सकाळी पारख हे गुजरातमधील वलसाड येथे सुखरूप असल्याचे समजल्यानंतर नातलग व त्याच मार्गावर गेलेल्या पोलिसांनी त्यांना दुपारी सुरक्षितरीत्या नाशिकमध्ये आणले. या प्रकरणाला आर्थिक व्यवहाराची किनार असल्याचीही चर्चा आहे.
हे प्रश्न अनुत्तरीत…
पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण झाल्यावर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना वलसाड येथे संशयितांनी सोडून दिले. मग संशयितांनी त्यांच्या अपहरणाचा डाव रचला होता तरी कशासाठी ? ज्या ‘वॉर फुटिंग’ वर पारख यांचे अपहरण झाले, तेव्हढीच तत्परता अपहरणकर्त्यांनी त्यांना मुक्त करताना दाखवण्यामागील गमक काय ? पारख यांचा सुखरूप असल्याचा संदेश येईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांशी अपहरणकर्त्यांनी संपर्क साधला होता का ? किंवा संशयित नेमके इतर कोणाच्या संपर्कात होते का? प्रवासादरम्यान संशयितांनी पारख यांच्याशी नेमका काय संवाद साधला ? ज्याठिकाणी संशयितांनी पारख यांची मुक्तता केली, तिथे पोलिस, त्यांचे मित्र आणि नातलग पोहोचले नेमके कसे पोहचलेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप तरी मिळालेली नसल्याने शहरवासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.