नाशिक/एनजीवन नेटवर्क
सकारात्मकता हा बोलण्याचा, वागण्याचा विषय असला तरी त्यावर लिहिणे सोपे नाही. कठीण प्रसंगदेखील वाचतांना चेहऱ्यावर हसू येईल, असे ओघवते लिखाण डॉ.हेमंत ओस्तवाल यांनी केले आहे. त्यांचे ‘पंख सकारात्मकतेचे’ हे पुस्तक अनेकांना जगण्याची नवी दृष्टी देणारे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले.
त्र्यंबकरोडवरील फ्रावशी अकॅडमी येथील सभागृहात सकाश प्रकाशन प्रकाशित व डॉ.हेमंत ओस्तवाल लिखित ‘पंख सकारात्मकतेचे’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी लेखक व सुयश हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार मोर, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बीजी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष नंदकिशोर साखला, सॅमसोनाईड इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष यशवंत सिंग, ज्येष्ठ अथिरोगतज्ज्ञ डॉ.विजय काकतकर, फिजिशियन डॉ.विजय घाटगे, ‘फ्रावशी स्कूलचे रतन लथ आदी उपस्थित होते.
अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, की नकारात्मकतेच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीला कितीही सांगून उपयोग होऊ शकत नाही. आधी त्याचा दृष्टीकोन सकारात्मक केल्यानंतर मगच सांगितलेली गोष्ट समजते. पुस्तकातील कुठलेही पान वाचायला घेतले की याची प्रचिती येते असे ते म्हणाले.करिअरच्या सुरुवातीच्या टप्यात प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे मलाही दडपण होते. दिग्दर्शक काय म्हणतील, निर्मात्यांच्या अपेक्षा, प्रेक्षकांना अभिनय आवडेल का, असे अनेक प्रश्न मलाही पडायचे. परंतु सुमारे ३५ वर्षांच्या अनुभवानंतर आता लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या मनोरंजनासाठी काम करतो, असा अनुभव अभिनेते श्री.खेडेकर यांनी सांगितला.
डॉ.हेमंत ओस्तवाल म्हणाले, की नियमित लेखक नसतांना, आयुष्यात घडलेल्या घटना लिहित गेलो. आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटले, त्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळाले. कुटुंबीयांची खंबीर साथ लाभली.
वार्षिक आरोग्य तपासणीच्या निमित्ताने नियमितपणे डॉ.ओस्तवाल यांच्याशी संपर्क येत गेला. प्रत्येक भेटीत त्यांच्यातील सकारात्म्कता अचंभित करणारी होती. विशेषतः कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या टप्यात जेव्हा खासगी रुग्णालये कोविडसाठी खाटा उपलब्ध करुन देण्यास तयार नव्हती, तेव्हा दाखविलेली सकारात्मकता हजारो रुग्णांसाठी दिलासादायक ठरली. आता हीच ऊर्जा वाचकांपर्यंत पुस्तकाच्या रुपाने पोहोचणार असल्याचे मत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चंद्रकांत संकलेचा आणि प्रियंका पारख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सुरेखा ओस्तवाल, डॉ.पुजा ओस्तवाल-महाडिक व इतर मान्यवरांनी यांनी केले. आभार डॉ.सचिन महाडिक यांनी मानले.