- मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
मराठी रंगभूमीवरची सर्जनशील, बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी यांचे अनुक्रमे लेखन-दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांच्या भूमिका असलेल्या ‘लग्नपंचमी’ला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला आणि दोन महिन्यात त्याचे २५ प्रयोग झालेसुद्धा. या रजतमहोत्सवी प्रयोगाच्या निमित्त्ताने मराठी भाषा गौरव दिनी या नाटकाच्या निर्मात्यांनी नाटकाचा ‘वर्ल्ड टूर’ अर्थात परदेश दौरा जाहीर केला असून तो अशाप्रकारचा मराठी नाटकाचा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.
या दौऱ्याविषयीचा आणखी तपशील लवकरच जाहीर होणार असून, या घोषणेनंतर नाटकाबद्दल जगभरातील मराठी रसिकांमध्ये औस्तुक्य लागून राहिले आहे.फ्लिक्स प्ले एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेचे यतीन पाटील यां निर्मात्या कंपनीचे यतीन पाटील यांनी या नाटकाच्या आजच्या पंचविसाव्या प्रयोगाच्यावेळी ही घोषणा केली. या नाटकाचा पंचविसावा प्रयोग मराठी भाषा गौरव दिनी रवींद्र नाट्य मंदिर येथे हाउस फुल गर्दीत झाला.
या परदेश दौऱ्यात ‘लग्नपंचमी’चे प्रयोग अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया- आणि-न्यूझीलंड, आशिया खंडातील देश, मध्यपूर्व देश तसेच युरोपसह युनायटेड किंग्डम येथे आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात इतक्या व्यापक स्तरावर विविध खंडांमध्ये एकत्रित दौऱ्याची घोषणा होणे ही अभिमानाची बाब मानली जात असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली.
परदेश दौऱ्याची घोषणा करताना, यतीन पाटील म्हणाले की, अशाप्रकारचा मराठी नाटकाचा हा पहिला दौरा असणार आहे. “बॉलीवूडच्या कार्यक्रमांचा दौरा होतो तेव्हा जगभरात होणाऱ्या सर्व शोंची घोषणा एकत्र होते. मराठी नाटकांच्या किंवा कार्यक्रमांच्या बाबतीत तसे होत नाही. जगभरातील प्रयोग एकाच वेळी जाहीर होत नाहीत.‘लग्नपंचमी’च्या बाबतीत आम्ही ते करणार आहोत ,” असे यतीन पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “माझे स्ट्रॅटेजी पार्टनर “दि आयडियाज” त्यांचेही त्यासाठी खूप खूप आभार. तुम्हा रसिकांचा प्रतिसाद मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मिळाला. तसाच तो परदेशांमधील प्रयोगांनाही मिळेल याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. परदेशातील प्रयोगांची आम्ही आतुरतेने वाट पहात आहोत. तुम्हीही पुढील घोषणेची वाट पहा. ‘लग्नपंचमी’च्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मिक्सबॉक्स इंटरटेन्मेंट या पेजला भेट द्यायला विसरू नका.”
या नाटकाचा निर्माता आणि मध्यवर्ती भूमिकेतील कलाकार स्वप्नील जोशी म्हणाले की निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांच्यासाठी आजचा क्षण अत्यंत मोलाचा आहे. “मराठी भाषा गौरव दिनी नाटकाचा पंचविसावा प्रयोग होत आहे, हा नटराजाचा आशीर्वाद आहे आणि सर्वांसाठीच दुग्ध-शर्करा योग आहे. विक्रमी वेळेत आम्ही या नाटकाचे पंचवीस प्रयोग केले आहेत. आम्हालाही माहित नव्हते पण प्रेक्षकांनीच हे आमच्या ध्यानात आणून दिले. कोणत्याही कलाकारासाठी, निर्मात्यासाठी ही अत्यंत आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याचवेळी परदेश दौऱ्याची केलेली घोषणाही उत्साह, हुरूप वाढविणारी आहे. आनंद आणि अभिमानाबरोबरच आज उर भरून आला आहे,” ते म्हणाले.
नाटकातील मध्यवर्ती भूमिकेत असलेली आणि नाटकाची एक निर्माती असलेली अमृता खानविलकर म्हणाली, “मी इथे अभिनेत्री आहे आणि निर्मातीही आहे. या नाटकाच्या यशाने मला जो आनंद झाला आहे, तो शब्दांत सांगणे कठीण आहे.”
नाटकाची लेखिका आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणाली, “हे नाटक सर्व वयोगटांचे, कुटुंबाचे, विनोदाचे आहे आणि त्याहीवर महत्वाचे म्हणजे ते रसिक प्रेक्षकांचे आहे. या नाटकाला रसिकांकडून एवढा प्रतिसाद मिळेल असे मला ते लिहिताना वाटले नव्हते.या नाटकाचे यश हे आमच्या दिग्दर्शकाप्रमाणे निर्माते, कलाकार यांचेही आहे. पण हे नाटक सर्वात महत्वाचे म्हणजे ते डोक्यावर घेणाऱ्या रसिक प्रेक्षकांचे आहे.”
घोषणेपासूनच मराठी नाट्यसृष्टीत प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाचा शुभारंभ जानेवारीत झाल्यानंतर महाराष्ट्रभर त्याचे सर्वदूर २५ प्रयोग झाले आहे. सातारा, सांगलीपासून कोथरूड, पुणे आणि मुंबईतील प्रेक्षकांनी या नाटकाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
मधुगंधा यांचे लेखन व निर्मिती आणि निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन व जोडीला स्वप्नील जोशी यांचे तब्बल बारा वर्षांनी रंगभूमीवर होत असलेले पदार्पण यामुळे रसिक या नाटकाला उत्तुंग प्रतिसाद देत आहेत. त्याशिवाय मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस चेहरा अमृता खानविलकरने या नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले आहे. ‘लग्नपंचमी’ हा लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने मांडणारा नवीन मराठी प्रयोग म्हणून या नाटकाकडे पाहिले गेले.
स्वप्नील आणि अमृता यांच्यासह या नाटकात सुनील अभ्यंकर, मधुगंधा कुलकर्णी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ‘मयसभा’निर्मित ‘लग्नपंचमी’चे नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाश शीतल तळपदे, वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून नितीन नाईक सहनिर्माता आहेत. मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर आणि तृप्ती पाटील या नाटकाचे निर्माते आहेत.
Comments are closed.