नाशिक/एनजीएन नेटवर्क
श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, स्त्रीशक्ती लोकसंचलित साधन केंद्र आणि नाशिक रेडक्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमधील विविध महिला बचतगटाच्या सदस्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन विभागीय (महसूल ) उपायुक्त प्रज्ञा बडे मिसाळ यांचे हस्ते झाले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व रेडक्रॉस चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते. तर व्यासपीठावर सचिव डॉ. सुनील औंधकर , कोषाध्यक्ष मेजर पी.एम. भगत , समन्वयक डॉ. प्रतिभा औंधकर, स्त्रीशक्ती साधन केंद्राचे व्यवस्थापन माहिती अधिकारी निलेश थोरात, स्त्रीशक्ती केंद्राचे सुनिता गायकवाड , शीतल लोखंडे, समाधान गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. ” महिलांचे आरोग्य उत्तम असेल तरच त्यांचा सक्षमीकरणाच्या दिशेने प्रवास वेगवान होतो . त्यामुळे महिलांसाठी आरोग्यशिबिरे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रज्ञा बडे यांनी केले .
दरम्यान शिबिरात डॉ. कुणाल निकम , डॉ. शैलेश बडवर आदींनी रुग्णतपासणी केली . यावेळी रुग्णांच्या रक्तशर्करा , रक्तदाब , ईसीजी तपासण्या मोफत करण्यात आल्या. तर सुरभी हॉस्पिटल चे कुलदीप यांनी नेत्रतपासणी तर मायक्रोजेन चे सुशील इंगळे यांनी हिमोग्लोबिन तपासणी विनामूल्य केली . या उपक्रमांतर्गत ऑगस्ट मध्ये नाशिकमधील ८५० हुन अधिक सक्रिय महिला बचतगटांसाठी विविध भागांत दहा आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून यातील रुग्णांवर शासकीय योजनांतर्गत विनामूल्य उपचारांची सुविधा देण्यात येणार आहे. शिबीर यशस्वितेसाठी संतोष आहेर , चंद्रकांत गोसावी , जयश्री कुलथे , मंगला कस्तुरे आदी प्रयत्नशील होते .