मुंबई/एनजीएन नेटवर्क
उद्या (दि. २७) साठी राज्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून दोन दिवसांपूर्वी वर्तवण्यात आला होता.
दुसरीकडे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी पावसाचा जोर थोडा ओसरला होता, मात्र सोमवारी पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.