नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
आगामी 2024 ची लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणीत एनडीए आणि विरोधी ऐक्याच्या इंडिया या दोन मोठ्या आघाड्यांमध्ये थेट लढत होणार आहे. आज निवडणूक झाली तर एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळतील, याबाबत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने एक सर्वे केला आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 318 जागांसह स्पष्ट बहुमत मिळू शकते. इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318, इंडियाला 175 आणि इतरांना 50 जागा मिळू शकतात. ‘इतर’ मध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे.
या ओपिनियन पोलनुसार, 2024 च्या निवडणुकीत देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल पण भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. भाजपच्या जागा 303 वरुन 290 पर्यंत खाली येऊ शकतात, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला 100 चा आकडा काही गाठता येणार नाही. काँग्रेसच्या जागा 52 वरुन 66 पर्यंत वाढू शकतात. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागा 22 वरुन 29 पर्यंत वाढू शकतात आणि सभागृहात तृणमूल हा तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. तर, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वाय.एस.आर. काँग्रेसच्या जागा कमी होण्याचा अंदाज असून त्या 22 वरुन 18 वर येऊ शकतात.
उद्धव यांना संजीवनी मिळणार
सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाकडे 6 जागा आहेत, त्या 11 पर्यंत वाढू शकतात. देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तर इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 20, काँग्रेस 9, शिवसेना (शिंदे) 2, शिवसेना (ठाकरे गट) 11, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेश मधून 80 खासदार निवडून लोकसभेत पोहोचतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशात सर्वात मोठा विजय मिळू शकतो. इथे लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी 73 जागा NDA ला मिळू शकतात. तर INDIA ला उर्वरित सात जागा मिळू शकतात. याशिवाय गुजरातमधील सर्व 26 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे, तर उत्तराखंडमधील पाचही जागा भाजपच्या ताब्यात जाऊ शकतात. कर्नाटक विधानसभा काँग्रेसने जिंकली आहे. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला फायदा होईल अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत इथल्या 28 पैकी 20 जागा एनडीएला मिळू शकतात, तर INDIA ला सात जागा मिळू शकतात. एक जागा जनता दल-एसला मिळण्याचा अंदाज आहे.