एनजीएन न्यूज नेटवर्क
संघटनात्मक अस्तित्वासाठी झगडत असलेल्या उध्दव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसेना या दोन राजकीय व्यवस्था इतरत्र ‘पहले आप’ म्हणत परस्परांच्या बुलाव्याच्या प्रतीक्षेत असताना नाशकात मात्र या दोहो पक्षांनी अघोषित युती जाहीर केली आहे. एव्हढ्यावरच न थांबता दोन्ही पक्षांच्या स्थानिक कारभाऱ्यांनी नाशिककर सामोरे जात असलेल्या समस्यांविरोधात शड्डू ठोकण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा संयुुक्त कार्यक्रमही जाहीर केला आहे. यामुळे पाशवी संघटन तयार करून सत्ता सोपानावर विराजित होण्याच्या उन्मादात असलेल्या भाजपला किमान नाशिकमध्ये तरी विरोधी पक्ष जिवंत आहे, या वास्तवाची जाण ठेवावी लागणार आहे.
अर्थात, दोन्ही पक्षांच्या एकत्र येऊन उभ्या करण्यात येणाऱ्या लढ्यात महापालिका निवडणूकांत अस्तित्व दाखवण्याचा छुपा अजेंडा लपून राहिलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे बंधूंच्या पक्षांचे अक्षरश; लचके तोडून दोन्ही पक्षांंना नामशेष करण्याचा जणू विडा उचलला आहे. हे साध्य साधताना नाशिक महापालिकेत स्वबळावर जागांची शंभरी गाठण्याची अतिरेकी महत्वाकांक्षाही भाजपने अजेंड्यावर ठेवली आहे. राज्याच्या सत्तेत असलेला अजितदादांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शहरात फारसे बाळसे धरून नसला तरी शिंदेंची शिवसेना चांगल्यापैकी पाय रोवून आहे, याचे स्थानिक भाजपेयींना पुरते भान आहे. म्हणूनच आधी विरोधकांना नामोहरम करायचे आणि ऐनवेळी महायुती मोडीत काढून महापालिकेत ‘कमळ’ फुलवायचा भाजपचा प्लान असल्यास आश्चर्य वाटू नये.
यत्र-तत्र-सर्वत्र सत्तासोपानावर विराजित झालेल्या भाजपला नाशिकमध्ये सक्षम पर्याय देण्यापोटीच संघटनात्मक विकलांगतेचे रडगाणे बाजूला ठेवून ठाकरे बंधूंच्या नेतृत्वातील सेनांनी वज्रमूठ बांधण्याचा निर्धार केल्याचे म्हणता येईल. वरवर चांगभलं जाणवत असले तरी नाशिककरांना नाना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक जनतेची हीच दुखरी नस पकडत जनांदोलनाची हाक दोहो सेनांनी दिली आहे. विशेषत: शहराला बदनाम करणारे एमडी ड्रग्ज प्रकरण, हनी ट्रॅप प्रकरण, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, सार्वत्रिक खड्ड्यांचे साम्राज्य, अनियमित पाणीपुरवठा या मुद्द्यांच्या विरोधात शंखनाद करण्याचा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला. यामधील या पक्षांचा राजकीय स्वार्थाचा भाग समजण्याजोगा असला तरी नाशिककर खरोखरच ‘पॅनिक’ आहेत, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. लोकप्रतिनिधी नसल्याने महापालिकेचा कारभार ‘रामभरोसे’ सुरू आहे. प्रशासकीय असंवेदनशीलतेने कळस गाठला आहे. समस्या कोणाकडे मांडायच्या, जाब कोणाला विचारायचा अशा गोंधळलेल्या स्थितीत नाशिककर सध्या आहेत. सत्तेमधील भाजपला कितीही वाटत असले तरी हा पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात येऊ शकत नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मूळ कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष शहरात केवळ नावापुरते आहेत. याच अनुषंगाने मराठी माणसाच्या हक्कासाठी जन्मलेल्या दोन सेना आता जनहितार्थ पुढाकार घेताहेत, हे सुलक्षणी पाऊल म्हणावे लागेल. ठरवलेल्या अजेंड्याप्रमाणे वाटचाल केल्यास कोणीतरी नाशिककरांचा आवाज बनतेय, ही बाब स्थानिक ‘पौरां’ना नक्कीच सुखावणारी असेल.
अर्थात, उध्दव-राज जोडगोळीच्या सेनांनी राजकारणाहून जनहित प्रधानस्थानी ठेवले तरच ईप्सितप्राप्ती होईल, या कडवट सत्याचे भान ठेवणे अपरिहार्य ठरणार आहे. मी, माझा पक्ष, माझे कुटुंब, माझा जातबांधव श्रेष्ठ या अहंभावाचा उद्या युती झाल्यास तिकीट वाटपावेळी डंख मारला जाऊ नये. किंबहुना, त्यासाठीही सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होण्याची शक्यता गृहित धरून दोन्ही सेनांच्या स्थानिक सेनापतींनी खबरदारी घेणे अनिवार्य राहील. नि:स्वार्थी हेतूने ठेवलेला एकोपाच दोहोंना एक मजबूत राजकीय व्यवस्था म्हणून पुढे येण्याची संधी निर्माण करून देईल. त्यासाठी ‘अथ’पासून ‘इति’पर्यंत दक्ष राहण्याचे शहाणपण ठेवण्यातच दोहोंचे क्षेम आहे.
Comments are closed.