कांदा बाजारभावात घसरण कायम; विंचूरला सरासरी 975 रुपये भाव
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ; जास्तीत जास्त 1,156 रुपये, किमान दर 351 रुपये
** राकेश बोरा
लासलगाव : एनजीएन न्यूज नेटवर्क
दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात बुधवारी सकाळच्या सत्रात कांद्याच्या लिलाव पार पडले. पाडव्याच्या निमित्ताने कांद्याच्या बाजारभावात शंभर ते दोनशे रुपयांची वाढ होईल, अशी शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती. मात्र, वास्तवात ती अपेक्षा फोल ठरली असून कांद्याच्या भावात कोणतीही वाढ न होता घसरणीचाच कल कायम राहिला आहे.
बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याला जास्तीत जास्त 1,156 रुपये, कमी दर 351 रुपये, तर सरासरी दर 975 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. बाजारात आज एकूण 311 वाहनांतून उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. तथापि, भावात वाढ होण्याऐवजी एक हजार रुपयांच्या आत आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
कांद्याच्या या दरातून उत्पादन खर्च तर दूरच, परंतु वाहतूक आणि मजुरी खर्चसुद्धा निघत नाही, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.कांद्याच्या वाढत्या उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता आणि दरघसरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कांद्याला प्रतिक्विंटल किमान 1,000 ते 1,500 रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे करत आहेत.
———-
आम्ही दिवसरात्र मेहनत घेऊन कांदा तयार केला, पण भाव मात्र उत्पादन खर्चालाही पुरत नाही. पाडव्याच्या दिवशी तरी काहीतरी वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण बाजारभाव आणखीनच कमी झाला. सरकारने आम्हाला उत्पादन खर्च्याचा दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये हमीभाव कसा मिळाले यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
राजेंद्र कराड (कांदा उत्पादक शेतकरी, शिवरे, ता. निफाड)
——-
कांद्याचे दर 700 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या भावात काहीही हातात राहत नाही. वाहतूक आणि मजुरी खर्चही भागत नाही. सरकारने कांद्याला हमीभाव आणि किमान एक हजार ते पंधराशे रुपये विक्री झालेल्या व विक्री होत असलेल्या कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्यावे.
विठ्ठल नागरे (कांदा उत्पादक शेतकरी, डोंगरगाव, ता. निफाड)
Comments are closed.