NGN News
Latest Marathi News

अभाविप हीरक महोत्सवी प्रदेश अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटन

  • अधिवेशन स्वागत समिती अध्यक्षपदी प्रा. जयंत भातांबरेकर; सचिवपदी सागर वैद्य यांच्या नावाची घोषणा

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पश्चिम महाराष्ट्र प्रांत अधिवेशनाच्या तयारीस गती देण्यासाठी नाशिक येथे स्थापन करण्यात आलेल्या प्रांत अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.

उद्घाटन सोहळ्याला अभाविप पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटन मंत्री श्री. गितेश चव्हाण, प्र कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, सा. फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, उद्योजक प्रा. जयंत भातांबरेकर, भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने आदींसह मान्यवर उपस्थित होते. प्रतिमापूजन व समूहगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमोदजी यांनी यावेळी अधिवेशन स्वागत समितीची घोषणा केली. समितीच्या अध्यक्षपदी प्रा. जयंत भातांबरेकर, तर सचिवपदी सागर वैद्य यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

प्रांत अधिवेशनाच्या सर्वांगीण नियोजनाचे केंद्रबिंदू म्हणून या कार्यालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. कार्यक्रम नियोजन, संचलन व व्यवस्था, समित्यांचे समन्वय, प्रचार-प्रसार, मीडिया समन्वय आणि कार्यकर्ता संपर्क या सर्व उपक्रमांचे संचालन या कार्यालयातून केले जाणार आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. गितेश चव्हाण म्हणाले की, अभाविपचे प्रांत अधिवेशनाला १ हजार विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित राहणार असून विद्यार्थी प्रश्न, शिक्षणातील सुसंस्कारित मूल्ये, युवकांच्या प्रगतीची दिशा आणि संघटनात्मक कार्य या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे.

अधिवेशनातील विषयक समित्यांची रूपरेषा, प्रतिनिधी नोंदणी, पाहुण्यांचे वेळापत्रक, उपक्रमांची आखणी आणि ठरावांची प्राथमिक तयारी या कार्यालयातून राबवली जाणार आहे. यासाठीच्या २३ व्यवस्था समिती स्थापन केल्या गेल्या असून त्यात २२१ कार्यकर्ते कार्यरत झाले आहे. नाशिकमध्ये प्रांत अधिवेशनाची धामधूम सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्घाटक प्रमोद कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला एक उत्तम अनुभव मिळेल. कार्यालयाच्या कार्यान्वयनामुळे अधिवेशनाच्या तयारीला अधिक वेग व दिशा मिळेल.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ यांनी तर आभार प्रदर्शन अभावीप नाशिक महानगर मंत्री व्यंकटेश अवसरकर यांनी केले.

Comments are closed.