निफाड/एनजीएन नेटवर्क
पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद केली जाणार नसल्याचा ठराव तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने केल्यानंतर त्यावर राईट टु लव्ह संघटनेने आक्षेप नोंदवला आहे. सदर ठराव ग्रामपंचायतीने रद्द न केल्यास संघटनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
सायखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाह नोंद ग्रामपंचायतीत केली जाणार नसल्याचा ठराव केला आहे. या ठरावाला राईट टु लव्ह संघटनेने आक्षेप घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना असे बेकायदेशीर ठराव करणे म्हणजे स्वातंत्र्याची पायमल्ली करण्यासारखे आहे. हा ठराव तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
ठराव बेकायदेशीर, असंविधानिक
सर्वोच्च न्यायालयाने प्रेम करणे, जोडीदार निवडणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असल्याचे मान्य केले आहे. तसेच आपल्याकडील विवाह संदर्भातील कायद्यांमध्ये प्रेमविवाहाविषयी कोणतीही वेगळी तरतूद नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रेमविवाहाविषयी केलेला ठराव हा बेकायदेशीर, असंविधानिक असून राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या जोडीदार निवडण्याच्या अधिकारावर हा ठराव गदा आणणारा असल्याचे संघटनेने म्हटले आहे.