NGN News
Latest Marathi News

येवल्यात गांजाजप्ती, सायखेड्यात सराईत दरोडेखोर टोळी जेरबंद

बाळासाहेब पाटील : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवायांनी गुन्हे विश्वाला दणका

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

ग्रामीण पोलिसांनी दोन वेगळ्या कारवाया केल्याने गुन्हे विश्व हादरले आहे. पहिल्या कारवाईत येवल्यात चार लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईमध्ये सायखेड्यात दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीला बेड्या घातल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती आज प्रसार माध्यमांना दिली.

येवल्यातील कारवाईत सुमारे वीस किलो उच्च प्रतीचा गांजा जप्त करण्यात आला. प्लास्टिक गोण्यांमध्ये आढळलेल्या या गांजाचे बाजारमूल्य चार लाख रुपये इतके आहे. याप्रकरणी किशोर कल्याण लकारे ( २७ ) यास अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार सुनील रघुनाथ कचरे हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले. सदर टोळीमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत सायखेडा पोलीस ठाणा हद्दीत दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी ग्रामीण पोलिसांनी बजावल्याची माहितीही पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली. गेल्या १३ जुलै रोजी म्हाळसाखोरे शिवारात राजेंद्र मुरकुटे यांच्या निवासात घुसून कुटुंबियांना धाक दाखवत सुमारे ३.८४ लाखांचे दागिने या टोळीने लुटले होते. परिसरातील इतर चार घरांमध्येही या टोळीने चोरीचा प्रयत्न केला होता. या टोळीतील विशाल बनसोडे ( रा. सायने , त. मालेगाव ), दिलीप चव्हाण ( रा. सोमठाणे, ता. सिन्नर ) आणि राहुल चव्हाण ( रा. सायखेडा ) या त्रिकुटाला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या टोळीतील इतर तीन साथीदार रायगडमधील एका दरोड्याच्या गुन्ह्यात आधीच शिक्षा भोगत आहेत. या तोलीओवर २३ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Comments are closed.