मुंबई/एनजीएन नेटवर्क
गेल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३४ सापळे रचले असून त्यात ६०५ शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. राज्यात लाचखोरीत महसूल विभाग पहिल्यावर तर पोलीस विभाग द्वितीय स्थानावर असल्याचे एसीबीच्या संकेतस्थळावर प्रकाशित माहितीत अधोरेखित झाले आहे. महसूल विभागात सर्वाधिक तलाठी तर पोलीस विभागात सर्वाधिक पोलीस हवालदारांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे.
नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले असून तब्बल ९१ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सापळे रचण्यात आले. लाचखोरीत द्वितीय स्थानावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असून तिथे प्रत्येकी ७४ लाचखोरीचे गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या स्थानावर ठाणे (५४) तर नागपूरचा (४३) सातवा क्रमांक लागतो.
लाचखोरीत महसूल, पोलीस आघाडीवर
गेल्या सहा महिन्यांत महसूल विभागात १०४ लाचखोरीचे सापळे रचले गेले असून त्यात १४२ लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ८७ वर्ग तीनच्या कर्मऱ्यांचा समावेश आहे. पोलीस विभागावर ७९ सापळे रचले गेले असून १०९ लाचखोर पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यात ८४ पोलीस हवालदारांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर पंचायत समिती असून ४५ सापळे रचण्यात आले असून ५९ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर लाचखोरीत महापालिका, वीज महामंडळ आणि शिक्षण विभागाचा क्रमांक लागतो.
सहा महिन्यांतील आकडेवारी अशी..
महिना, सापळा, आरोपी
जानेवारी – ५९ – ४६
फेब्रुवारी – ७५ – १११
मार्च – ८८ – १२४
एप्रिल – ७० – १००
मे – ६९ – १००
जून – ७३ – ९०