मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावर टपाल तिकीट येणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक शहर मुख्य टपाल कार्यालयाचा ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ म्हणून समावेश झाला असून हा मान मिळवणारे नाशिक हे पोस्ट ऑफिस ठरले आहे. यामुळे नाशिकच्या शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून ही बाब साध्य झाली आहे.
नाशिकचा कुंभमेळा २०२७ ऐतिहासिक असणार आहे. त्यामुळे आयकॉनिक पोस्ट ऑफिससाठी नाशिक हे केवळ पूरकच नाही, तर एक आदर्श ठिकाण आहे. याच अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहर मुख्य टपाल कार्यालयाचा ‘आयकॉनिक पोस्ट ऑफिस’ मध्ये समावेश करण्याची मागणी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
जानेवारी २०२५ मध्ये पोस्ट विभागाने देशभरातील पोस्टल सर्कल्सकडून आयकॉनिक टपाल कार्यालयांची निवड करण्यासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यात फिलॅटेली टपाल तिकीट संग्राहकत्व प्रोत्साहनासाठी जास्त वर्दळ असणारी पोस्ट कार्यालये, तसेच फिलॅटली ब्युरोंचे मानकीकरण करण्याबाबत सूचना मागविण्यात आल्या होत्या. आपल्या नाशिक पोस्ट ऑफिसमध्ये फिलॅटेली ब्यूरो आधीपासूनच अस्तित्वात आहे. तसेच नाशिक सिंहस्थ कुंभमेळा व नाशिकचा अध्यात्मिक, सांस्कृतिक, खगोलशास्त्रीय व ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीकोनातून आणि ‘अतुल्य भारत’ संकल्पनेतून नाशिकचा अध्यात्मिक वारसा जागतिक पातळीवर प्रोत्साहित करण्यासाठी प्रयागराज महाकुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यावर देखील टपाल तिकीट प्रसिद्ध करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. ती सुद्धा मंजूर झालेली असून २०२७ च्या वार्षिक कार्यक्रमात हे तिकीट प्रसिद्ध येणार आहे. स्मृतिचिन्ह टपाल तिकिटे ही विशेष प्रसंगी प्रसिद्ध होणारी लिमिटेड एडिशन टपाल तिकिटे असतात.
फिलॅटेलीला प्रोत्साहन मिळेल ..
या दोन प्रमुख गोष्टींबरोबरच नाशिक भूमी ही एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथे होणारा कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक-सांस्कृतिक सोहळा असून ५ कोटींहून अधिक भाविक नाशिकमध्ये येतात ज्यातून फिलॅटेलीला मोठे प्रोत्साहन मिळेल. नाशिक अध्यात्मिक राजधानी व ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने फिलॅटेली हब म्हणून आदर्श ठरेल. डाक विभागाला नाशिक कुंभमेळा – २०२७ दरम्यान पर्यटक व भाविकांमध्ये फिलॅटेलीचा प्रचार आणि प्रसार करता येणार आहे.
Comments are closed.