नाशिक/एनजीएन नेटवर्क
ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते?, असे धक्कादायक विधान पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त पडसाद उमटत आहेत. केंद्र सरकारने कांद्यावर अकस्मात निर्यातशुल्क लागू केल्याने परदेशात जाणार माल अडकून पडला आहे. दरम्यान केंद्र सरकारने निर्यातशुल्क वाढवले असल्याने सर्व बाजार समित्यांमधून निषेध व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे नाशिकमधील व्यापारी असोसिएशनने कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी परिस्थिती असताना भुसे यांनी परवडत नसल्यास चार महिने कांदा न खाण्याचा अजब सल्ला दिला आहे. कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणार आहेत त्या व्यापाऱ्यांमध्ये देखील थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. यातून निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.