मुंबई/एनजीएन नेटवर्क
भाजप नेते तथा देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांनी कोणताही लवाजमा व सुरक्षा न घेता नुकताच मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासून एकटाच प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी ही अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली. याबाबत गिरीश महाजन यांनी म्हटले की, पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे. प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. यामुळे नागरीकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते. पोलिस दलावरही भार वाढतो, म्हणून गेली 30 वर्ष आमदार होतो तेव्हाही आणी मंत्री झालो तेव्हापण एकट्यानेच प्रवास करतो.