नाशिक/एनजीएन नेटवर्क
पालकमंत्री असूनदेखील स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याची जबाबदारी नाशिक ऐवजी धुळे येथे दिल्याने दादा भुसे नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. भुसे यांच्या ऐवजी ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांना देण्यात आली असल्याने भुसे अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत होते. तथापि, भुसे यांनी ही केवळ पतंगबाजी असल्याचे स्पष्ट केले आहे. नाशकात माध्यमांशी बोलताना आपण नाराज असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. ते म्हणाले, आज देखील आपण बैठक घेतली. ध्वजारोहण संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतात. उद्या मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी काश्मीरला जाऊन देखील ध्वजारोहण करेन, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी यावेळी केले आणि त्या विषयावर पडदा टाकला.
उद्या स्वातंत्र्यदिनी नाशिकला गिरीश महाजन, धुळ्याला दादा भुसे तर अमरावतीला छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहेत, अशी यादीच जाहीर करण्यात आली होती. मात्र यावरून वाद सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टीकरण दिले होते. त्यावर आज दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिल्याने या चर्चा थांबणार आहेत.