मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यात नेतृत्व बदल होण्याच्या चर्चा हा केवळ पतंगबाजीचा प्रकार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार असून मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. एव्हढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याची पूर्णपणे स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील सर्वात मोठय़ा पक्षाचा नेता म्हणून मी ही घोषणा करीत असल्याचे सांगत फडणवीस यांनी मुख्यमंत्री-बदलाच्या चर्चाना पूर्णविराम दिला. झालाच तर कदाचित मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे त्यांनी नमूद केले. १० ऑगस्टच्या दरम्यान राज्यात नेतृत्वबदल होईल व अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान भवनाच्या प्रांगणात बोलताना केले होते. राष्ट्रवादीचे नेतेही तशी वक्तव्ये करीत होते.
या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संभ्रम फडणवीस यांनी दूर केला. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यांनी जाहीर बोलताना वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीबदलाची कोणतीही चर्चा नाही. शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, हे अजित पवार यांनीही स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांनी मनात संभ्रम ठेवण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.