NGN News
Latest Marathi News

नाशिक महापालिकेचा पहिला ग्रीन म्युनिसिपल बाँड इश्यू ‘एनएसई’ सूचीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

शाश्वत जल व्यवस्थापन पायाभूत सुविधासाठी निधी उभारणी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

शहरी पायाभूत सुविधा वित्तपुरवठा क्षेत्रात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत नाशिक महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांच्या च्या ग्रीन म्युनिसिपल बाँड्सचे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया येथे यशस्वीरीत्या सूचीकरण केले आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून जारी करण्यात आलेला हा पहिलाच सार्वजनिक ग्रीन म्युनिसिपल बाँड इश्यू असून नाशिक शहराच्या शाश्वत विकासाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.नाशिक महानगरपालिकेच्या दुसऱ्या म्युनिसिपल बाँड इश्यूच्या निमित्ताने आयोजित बाँड सूचीकरण समारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास राज्याचे कुंभमेळा मंत्री श्री गिरीश महाजन, आमदार सौ. सीमा हिरे, अप्पर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्ता, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग, नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा तसेच विविध वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यास नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेरआडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,  आयुक्त सौ. मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर तसेच नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ. मनिषा खत्री व अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्या हस्ते करण्यात आला.

या म्युनिसिपल बाँडच्या सार्वजनिक इश्यूला गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून हा इश्यू पाच पटांहून अधिक ओव्हरसब्स्क्राइब झाला आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या वित्तीय व्यवस्थापनावर तसेच शहराच्या दीर्घकालीन विकास क्षमतेवर गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास अधोरेखित झाला आहे.

ग्रीन बाँड इश्यूमधून उभारण्यात आलेला निधी प्रामुख्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहरातील जल पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून शहराच्या दीर्घकालीन विकासात ग्रीन बाँडमुळे मोठी भर पडणार आहे.

या इश्यूमधून प्राप्त झालेल्या निधीचा वापर पुढील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे :

·         मुकणे जलपुरवठा योजनेचा विस्तार

·         जलशुद्धीकरण प्रकल्प (वॉटर ट्रीटमेंट प्लांट- डब्लूटीपी) उभारणी

·         विल्होळी ते गांधीनगर दरम्यान गुरुत्वाकर्षणावर आधारित मुख्य जलवाहिनी उभारणी

·         सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी साधुग्राम व निलगिरी बाग जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी आवश्यक जल पायाभूत सुविधा उभारणी

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,“नाशिक महानगरपालिकेच्या ग्रीन बाँड्सचे यशस्वी सूचीकरण हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्वायत्तता अधिक सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची नवोन्मेषी आणि शाश्वत वित्तपुरवठा उपाययोजनांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होते. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यास या उपक्रमातून मोठी चालना मिळेल.”

तसेच नाशिक महानगरपालिकेने ग्रीन बॉण्ड सूचीकरण प्रक्रियेत राज्यात पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल समाधान व्यक्त करत नाशिक विकसित शहरांच्या यादीतही अग्रेसर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बॉण्ड मुळे केंद्र सरकार कडून जाहीर केल्या नुसार अमृत इंसेंटीव्ह  मुळे मनापास २० कोटी निधी प्राप्त होणार आहे.याच बरोबर  केंद्र शासनाच्या UCF अर्थात अर्बन चॅलेंज फंड करिता हा प्रकल्प पात्र झाला असून त्यामुळे मनपाच्या या ग्रीन बॉण्ड निधी उभारणीला बिनव्याजी कर्जच मिळणार आहे.

नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ. मनिषा खत्री म्हणाल्या की,“ही बाँड सूचीकरण प्रक्रिया नाशिक शहरासाठी अभिमानास्पद आहे.

Comments are closed.