जुने नाशिक/एनजीएन नेटवर्क
पावसाच्या वाढत्या जोरामुळे जुने नाशिक परिसरातील काझीगढी येथे भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती दरवर्षी प्रशासनाला असते. यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले असून तेथील शंभरहून अधिक धोकादायक घरांतील रहिवाशांना तत्काळ घरे रिकामी करावीत, अशा नोटिसा पाठवल्या आहेत.
नाशिकच्या गोदाकाठावरील काझीगढीवर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत शेकडो नागरिकांचे वास्तव्य आहे. पावसाळ्यापूर्वी काझीगढीप्रश्नी दरवर्षी यंत्रणा खडबडून जागी होते. बुधवारच्या इर्शाळ वाडीच्या घटनेमुळे पुन्हा काझी गढीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानुसार, पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणीच्या सूचना करत रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या आदेश दिले आहेत. गोदाकाठालगत शंभर फूट उंचीवर असलेल्या या गढीचा ढिगारा दरवर्षी ढासळतो. त्यामुळे दर पावसाळ्यात उपपयोजना करण्यावर महापालिका प्रशासन भर देत असते. मात्र नंतरच्या काळात पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. त्यामुळे गढीच्या संरक्षक भिंतीसह इतर उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. येथील शंभर घरांना नोटिसा देण्यात आल्या असून महापालिका कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.