NGN News
Latest Marathi News

डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन

‘अंनिस’ सह समविचारी पक्ष, संस्था, संघटनांचा सहभाग

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीमध्ये रुजवण्यासाठी त्यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त नाशिकमधील ‘अंनिस’चे कार्यकर्ते तसेच समविचारी पक्ष, संस्था, संघटनांचे कार्यकर्ते व ,पदाधिकारी यांनी सकाळी साडेसात वाजता निर्भय मॉर्निंग वॉक चे आयोजन केले होते.

मुंबई नाक्या जवळील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर यांना चळवळीच्या गीताच्या सामुदायिक गायनाने अभिवादन करून निर्भय मॉर्निंग वॉकची सुरुवात केली .
सीबीएस जवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथेही गुलाब पुष्प, चळवळीचे गीत व घोषणांनी अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारकात समारोप करताना पुन्हा प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या. संघटितपणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे तसेच हे काम म्हणजे व्यापक समाज बदलाच्या प्रक्रियेची सुरुवात असून याद्वारे शोषणमुक्त, समताधिष्ठित ,विवेकी असा मानवतावादी समाज घडवण्याच्या कृतिशील संकल्पाचे सामूहिक वाचनाने निर्धार करण्यात आला.

निर्भय मॉर्निंग वॉक या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड डॉ. डी एल कराड, कॉ. महादेव खुडे, अजमल खान आणि महाराष्ट्र अंनिसचे नाशिकमधील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी होते.

Comments are closed.