मुंबई/एनजीएन नेटवर्क
नाशिक, देवास, बंगळुरूमधील छापखान्यांतून 500 रुपयांच्या 1 हजार 761 दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. गायब झालेल्या नोटांचे मूल्य 88 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेने याप्रकरणी स्पष्टीकरण देत, माध्यमांमध्ये आलेली ही बातमी बरोबर नसल्याचे म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत म्हटले आहे की, नोटा छापण्याच्या कारखान्यातून नोटा गहाळ झाल्याची बातमी चुकीची आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याने हा प्रकार घडला आहे. प्रिंटिंग प्रेसमधून ज्या काही नोटा छापल्या जातात आणि आरबीआयला पाठवल्या जातात, त्यांची व्यवस्थितपणे काळजी घेतली जाते. या नोटांची छापाई, साठवणूक आणि वितरण यावर संपूर्ण प्रोटोकॉलसह रिझर्व्ह बँकेद्वार देखरेख केली जाते आणि यासाठी एक मोठी यंत्रणा अस्तित्वात आहे.