मुंबई/एनजीएन नेटवर्क
जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, जुलै महिन्याच्या अखेर पावसाची तीव्रता कमी होणार आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यातील पहिले दहा दिवसही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे भाकित हवामान विभागाने केले आहे. तर, पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात सौम्य पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात येत्या दोन ते तीन दिवसांत मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पावसाचा जोर ओसरणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर, पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या 17 टक्के जास्त पाऊस झाला होता. पूर्ण राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. अनेक जिल्ह्यात धरण व जलाशय तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक धरणे पूर्ण भरल्यामुळं पाणी चिंता मिटली आहे. पण एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाहीये. त्या तुलनेत कोकणात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं मराठवाड्यातील शेतकरी चिंतेच्या सावटाखाली आहे.