नाशिक/एनजीएन नेटवर्क
समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत मुला-मुलींना आजच्या काळात कोणाच्याही सहानुभूतीची नव्हे, तर सन्मानाने जगण्याचे बळ देण्याची गरज आहे, तसेच त्यांना जीवनातील पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी मदतीचा हात पुढे केला पाहिजे. या निरीक्षणगृहातील मुला-मुलींचा संस्थेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ करतात, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी केले.
उंटवाडीरोडलगत असलेल्या महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र शासन पुणे अंतर्गत, जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना नाशिक संचलित मुला – मुलींचे निरीक्षण व बालगृह नाशिक या संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग्यश्री बानायत बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी व निरीक्षण गृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह उपस्थित होते.
यावेळी बानायत म्हणाल्या, आजच्या काळात समाजातील अनाथ, निराधार, निराश्रीत, वंचित मुला-मुलींचे पुनर्वसन करण्याचे काम ही समाजाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या मुला-मुलींना देखील अन्य मुला-मुलींप्रमाणेच शिक्षणाचा आणि जगण्याचा हक्क असून त्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे. मी स्वतः कोरोनाच्या काळात एका अनाथ मुलीचा दोन वर्ष सांभाळ केला. तसेच यापुढेही निरीक्षण गृह व बालगृहासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आपण नक्कीच सहकार्य करू, असे आश्वासनही बानायत यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने म्हणाले की, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहाय्य लागत असेल तर आम्ही निश्चितच करू, तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास यासारख्या काही वर्गाचे आयोजन देखील आपण येथे करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात चित्रा कुलकर्णी म्हणाल्या, मुला मुलींचे निरीक्षण गृह बालगृह या संस्थेची माझा गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. गरजू मुला मुलींसाठी ही संस्था अत्यंत चांगले काम करते. या संस्थेचे सचिव चंदुलाल शाह हे सर्व समाजातील चांगले काम करणाऱ्या घटकांना एकत्र आणून सूत्रधाराचे काम करत आहेत. अशा व्यक्तींची आज समाजाला गरज आहे, असे सांगून त्यांनी या संस्थेत काही वर्षांपूर्वी नियमितपणे भेट दिली असतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी प्रशांत बच्छाव म्हणाले की, आजच्या काळात बालकांसाठी अनेक कायदे करूनही बालमजूर आपल्याला दिसतात. शहरात अशा बालकांची परिस्थिती थोडीशी बरी दिसत असली तरी तालुका आणि ग्रामीण भागात परिस्थिती अत्यंत विदारक आहे. नाशिक शहरात दानशूर व्यक्ती आणि संस्था अशा मुलांसाठी चांगले कार्य करत असल्याबद्दल त्यांनी गौरव उद्गार काढले. तसेच मुला मुलींचे निरीक्षण व बालगृह यासाठी कोणतीही मदत करण्यास आपण नेहमी तयार राहू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मी अनेक संस्था बघितल्या, तेथील व्यवस्था बघितल्या. मात्र येथील परिस्थिती अतिशय उलटी आहे. येथे सर्व सोयी सुविधा मुलांसाठी उपलब्ध असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी गोदामाई प्रतिष्ठानच्या सृष्टी देव यांनीही संस्थेबद्दलची आपली भावना व्यक्त केली. तसेच या ठिकाणी राहून शिक्षण घेतलेल्या मुला-मुलींना सामाजिक कार्याची नेहमीच आवड आणि गोडी निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी संस्थेचे सचिव चंदुलाल शाह यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, या संस्थेत शासनाच्या नियमाप्रमाणे ६ ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या सांभाळ करण्यात येतो. परंतु शासनाच्या अनुदानावर सर्व खर्च भागविणे शक्य नसल्याने देणगीदार संस्था आणि व्यक्ती यांच्या लोकसहभागातून ही संस्था कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा खर्च वाढला असून यासाठी आपण लोकवर्गणीतून पैसे जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यातूनच संस्थेसाठी नवीन इमारतीसह विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या काही मुलां-मुलींनी ही पुढे जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल केल्याचेही दाखले त्यांनी यावेळी दिले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले, तसेच संस्थेतील बालिकांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर समोर नृत्यगीत गणेश वंदना सादर केली. येथील मुला-मुलींना गुंज फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अमर कलंत्री व कोमल कलंत्री यांच्या हस्ते कपड्यांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे नंदू गायकर यांनी मदतीचा धनादेश संस्थेचे सचिव चंदुलाल शाह यांच्याकडे सुपूर्द केला. माजी प्राचार्य प्रा.डॉ.किशोर पवार व प्रा. नलिनी पवार यांनी येथील मुला मुलींसाठी पुस्तके भेट दिली. गोदमाई फाउंडेशनच्या वतीने मुलांना बिस्किटे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. लीना शेख यांनी केले. आभार प्रदर्शन डी. आर. पाटील यांनी केले.
पाहुण्यांचा व मान्यवरांचा सन्मान शशिताई अहिरे, गं.पा. माने, कोमल कलंत्री, केशव अण्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.