NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

वाईट प्रवृत्तीविरुद्ध लढयासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज : वालावलकर

0

** रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनच्या वतीने पत्रकारांचा सत्कार

नाशिक/एनजीएन नेटवर्क

सध्याच्या काळात समाजात काही चांगले घडत असताना समाजातील काही वाईट प्रवृत्तीमुळे सर्व समाजाचीच नव्हे तर देशाची देखील बदनामी होते, या प्रवृत्ती विरुद्ध लढा देण्यासाठी पोलीस, प्रसार माध्यमे आणि रोटरी सारख्या सामाजिक संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनच्या वतीने नाशिक मधील विविध दैनिके तसेच वाहिन्यांतील पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता; या कार्यक्रम प्रसंगी वालावलकर बोलत होत्या. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज काबरा, संचालक डॉ. अमित धांडे, डी. आर. पाटील, डॉ. किरण बिरारी, सोनिया व्होरा आदी उपस्थित होते.

याप्रसंगी वालावलकर म्हणाल्या, पोलीस दलामध्ये काम करताना शिस्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते. केव्हा काय घटना घडेल, हे सांगता येत नाही, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नेहमीच दक्ष राहावे लागते, असे सांगून त्यांनी गत काळातील विविध गुन्हेगारी क्षेत्रातील घटनांचा आढावा घेतला. आजच्या काळात संकटसमयी पोलीस आणि पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते हे आपण कोरोना काळात बघितले आहे, सर्वच ठिकाणी चांगले नेटवर्किंग असेल तर चांगले काम करता येते असे सांगून त्यांनी विविध ठिकाणी टाकलेले छापे आणि धाडी यांच्या संदर्भात माहिती दिली. तसेच कोणतेही काम करताना आपण आपल्या देशासाठी तथा राष्ट्रासाठी काम करतो हे लक्षात ठेवण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे वाईट प्रवृत्ती विरुद्ध लढा देण्यासाठी चांगल्या प्रवृत्तीने एकत्र येण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी विविध वृत्तपत्रातील पत्रकारांचा रोटरी क्लबच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ संपादक मिलिंद सजगुरे तसेच धनंजय रिसोडकर, प्रवीण बिडवे, राजेंद्र शेळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———————-

@ रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउनच्या वतीने आजवर ३७ प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. त्यांतर्गत ७०० वृक्षांचे रोपण, आदिवासी भागांमध्ये ९०० हून अधिक समुपदेशन कार्यक्रम, ५२ ठिकाणी हेप्याटीसीस बी लसीकरण, स्तनपान, माता आरोग्य यांबाबत मार्गदर्शन, बेबी किट्सचे वितरण, हर घर ध्यान ( मेडीटेशन) आदींचा त्यामध्य समावेश आहे.

  • मनोज काबरा, रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाउन
Leave A Reply

Your email address will not be published.