नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मंगळवारी (१८ जुलै) होणाऱ्या नव्या स्वरुपातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीत २०२४च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरणार आहे.
‘रालोआ’चे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १९ प्रादेशिक पक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले असून उपस्थित राहणाऱ्या पक्षांमधील काहींना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात स्थान दिले जाणार आहे. ‘रालोआ’मध्ये कोणते व किती प्रादेशिक पक्ष सामील होतील, याचा अंदाज घेऊन भाजप आगामी लोकसभा निवडणुकीची आखणी करत आहे. नव्या स्वरुपात ‘रालोआ’ची बांधणी केली जात असल्यानेदेखील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रेंगाळल्याचे सांगितले जाते. भाजपसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्यांमधील ‘रालोआ’मध्ये सामील झालेल्या पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात प्रामुख्याने सहभागी करून घेतले जाईल. त्यामुळे महाराष्ट्रातून शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट या दोन्ही फुटीर गटांना ‘रालोआ’च्या बैठकीला बोलवण्यात आले आहे. शिंदे गटाचे प्रतिनिधी उपस्थित राहतीलच, अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल बैठकीत सहभागी होतील. या दोन्ही गटांना मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद दिले जाऊ शकते. याशिवाय महाराष्ट्रातून रिपाइं आठवले गट, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आणि विनय कोरे यांचा पक्ष देखील या बैठकीचा भाग राहणार आहे.