मुंबई/एनजीएन नेटवर्क
पक्ष फुटीनंतर शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असून एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिले जाते. रोहिणी खडसे यांनी गेल्या विधानसभेची निवडणूक ही भाजपाकडून लढवली होती. पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. त्यानतंर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आले आहे.