मुंबई/एनजीएन नेटवर्क
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अर्थात वर्षभरापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत युती करणार होती आणि पक्षाच्या 51 आमदारांनी शरद पवार यांना पत्र दिले होते, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी द टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले. ते आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी शरद पवार यांच्याकडे पत्र देऊन भाजपसोबत जावे, असा आग्रह धरला होता. पण शरद पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तेत जाण्याची राष्ट्रवादीला संधी होती. राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपशी युती करण्याचा आग्रह पक्षाध्यक्षांना धरला होता. पण राष्ट्रवादीचे नेतृत्व निर्णय घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले, असा दावाही पटेल यांनी केला.