नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तकांमधील बराचसा मजकूर मनमानीपूर्वक वगळल्यामुळे संतापलेल्या सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी एनसीईआरटीचं सल्लागारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव हे दोघेही इयत्ता नववी ते बारावीच्या एसीईआरटीच्या मूलभूत राज्यशास्त्राच्या पुस्तकांचे मुख्य सल्लागार आहेत. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकतर्फी आणि अतार्किक मोडतोड केल्यामुळे दोघांनी संताप व्यक्त केला आहे.
सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी एनसीईआरटीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मुख्य सल्लागार म्हणून राज्यशास्त्राच्या पुस्तकांमधून आमची नावे काढून टाकावी. पाठ्यपुस्तकांचे तर्कशुद्धीकरण करण्याच्या नावाखाली त्यांचे विकृतीकरण केले गेले आहे. ज्यामुळे ही पुस्तकं शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. दरम्यान, पळशीकर आणि योगेंद्र यादव यांच्या पत्रावर एनसीईआरटीने म्हटलं आहे की, शालेय स्तरावरील पाठ्यपुस्तके दिलेल्या विषयावरील ज्ञान आणि आकलनाच्या आधारे विकसित केली जातात. यात वैयक्तिक लेखनाचा दावा केला जात नाही.