नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना दिलासा देताना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. मनी लाँडरिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत.
नवाब मलिक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. किडनीच्या ट्रान्सप्लांटसाठी मलिकांनी आधी हायकोर्टाकडे जामीनाची मागणी केली होती. त्यावेळी ईडीनं जोरदार विरोध केला होता. मात्र आज सुप्रीम कोर्टात ईडीने कोणताही विरोध केला नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नवाब मलिकांवर आरोप आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’नं कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. मलिक यांनी यापूर्वी वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मग हायकोर्टानेही जामीन नाकारला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने नवाब मलिकांना जामीन मंजूर केला आहे.