मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यभरातील प्रमुख धरणांमध्ये ऑगस्टअखेरपर्यंत मागील वर्षीपेक्षा २४ टक्क्यांची तूट असल्याची चिंताजनक बाब राष्ट्रीय जल आयोगाच्या अहवालात समोर आली आहे.
आयोगाकडून देशभरातील १५० प्रमुख व मोठ्या धरणांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये राज्यातील ३२ धरणांचा समावेश आहे. ही सर्व १५० धरणे सध्या ६३ टक्के भरली असून, त्यात मागील वर्षीपेक्षा १९ टक्क्यांची तूट आहे, तर दहा वर्षांच्या सरासरीचा विचार केल्यास सात टक्के तूट आहे. महाराष्ट्रातील ३२ धरणांमधील जलसाठा देशाच्या सरासरीहून अधिक असला तरीही तूट मोठी आहे. आयोगाच्या अहवालानुसार, राज्यातील धरणे सध्या ७२ टक्के भरली आहेत. हा आकडा दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत सहा टक्के कमी आहे. मात्र मागील वर्षी या काळात ही धरणे ९६ टक्के भरली होती. ऑगस्टअखेरीच्या जलसाठ्यानुसार महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड व पश्चिम बंगाल या चार राज्यांतील जलसाठा सरासरीवर आहे.