NGN News
Latest Marathi News

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉर अस्तित्वात येणार

  • ३७४ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी महामार्गाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

३७४ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी त्याला मंजुरी दिली आहे. पंधरवड्यावर येवून ठेपलेल्या राज्यातील महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर केंद्राचे जनतेला दिलेले हे गिफ्ट समजले जात आहे.

या महामार्गासाठी सुमारे १९,१४२ कोटी खर्च अपेक्षित असून तो बीओटी तत्वावर बांधण्यात येणार आहे. यामुळे लॉजिस्टिक्सला मोठ्या प्रमाणावर चालना मिळून रोजगारसंधी निर्माण होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या प्रकल्पाबाबत घोषणा केली. यामुळे नाशिक-अक्कलकोट ही दोन तीर्थस्थलांतील अंतर केवळ पाच तासांत पार करता येणार आहे, जे सध्या ९ तासांचे आहे. शिवाय, ५२४ किलोमीटर असलेले हे अंतर १५० ने घटून ३७४ किलोमीटरवर येईल. दरम्यान, केंद्र सरकारच्या या घोषणेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूर या महत्वपूर्ण शहरांना कुर्नुल सोबत जोडून जलद, सक्षम आणि सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पीएम गतीशक्ती योजनेचा भाग असलेला हा प्रकल्प अत्याधुनिक दळणवळणाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Comments are closed.