नाशिक/एनजीएन नेटवर्क
आगामी दोन वर्षे नाशकात 70 मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारती बांधण्यावर महापालिकेने बंदी आणली आहे. निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंच इमारतींमध्ये आग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक असलेली 90 मीटर उंचीची अग्निशामन शिडी खरेदी प्रक्रिया तांत्रिक अडचणीत सापडल्याने हा निर्णय घेतल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत नाशिक शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. मुंबई-पुण्यापाठोपाठ महाराष्ट्रातील द्रुतगतीने विकसित होणारे शहर म्हणून नाशिक सर्वपरीचीत आहे. स्वाभाविकच शहरातील बांधकाम प्रकल्पांची संख्या वाढत आहे. घरांची निकड पूर्ण करण्याकरता गृह प्रकल्पांच्या माळ्यांची संख्या वाढवण्याकडे व्यावसायिक लक्ष केंद्रित करीत आहेत. मात्र अशा इमारती उभ्या राहिल्यानंतर आगीच्या काही घटना घडल्यास शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हायड्रोलिक शिडीची आवश्यकता भासत असते. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने 90 मीटर उंचीची अग्निशमन शिडी अर्थात हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार सन 2021 च्या वार्षिक अंदाजपत्रकात 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. सद्यस्थितीत शिडी खरेदी अडकून पडल्याने खरेदी करेपर्यंत 70 मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.