NGN News
Latest Marathi News

नाशिकला 13 हजार कोटींची गुंतवणूक येणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आपल्या दावोस दौऱ्यातून नाशिकसाठी 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती वाढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमीपूजन ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, दिलीप बनकर, सरोज अहिरे, नितीन पवार आणि राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30 हजार कोटी रूपयांची विविध विकास कामे होणार आहेत. गोदावरी नदी निर्मल राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिकचा परिक्रमा मार्ग हा नाशिकचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे.

Comments are closed.